| उरण | वार्ताहर |
मुंबई व मुंबई लगतच्या नागरिकांचा प्रवास सुखाचा व आरामदायी व्हावा यासाठी मुंबई लोकलचा आणखी विस्तार करण्यात येत आहे. तब्बल 26 वर्ष रखडलेला हार्बर मार्गावरील रेल्वे मार्ग येत्या आठवड्याभरात प्रवाशांसाठी खुला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील खारकोपर ते उरण मार्गावरील पाच स्थानकांच्या कामांना सध्या वेग आला आहे. या बहुप्रतीक्षित रेल्वे मार्गावर आठवडाभरात लोकल ट्रेन धावणार असल्याने उरणकरांना आता वेळेत मुंबई गाठता येणार असल्याचे बोलले जाते. नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरण-खारकोपर या मार्गावरील राजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी, उरण या स्थानकांवरील विद्युत पुरवठ्यासह स्थानकाताली सफाईची कामे सध्या सुरू आहेत. तसेच येथील सूचना फलक, टाईम बोर्ड आदींचीही तपासणी सुरू आहे. या मार्गावरील नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या गव्हाण स्थानकाचे काम अपूर्ण असून फेब्रुवारी 2024 ला सदर काम पूर्ण होणार आहे, असे असले तरी तरघर स्थानकाचे काम अपूर्ण असताना 2018 साली नेरुळ ते खारकोपर लोकल सुरू करण्यात आली आहे.