| वाशिम | प्रतिनिधी |
वाशिमच्या कारंजा शहरातील सावळकर चौकात दुचाकी आणि डंपरचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
वाशिमच्या कारंजा शहरातील अकोला- मूर्तिजापूर आणि संभाजीनगर- नागपूर या महामार्गावरील सावळकर चौकात शुक्रवार (दि.14) दुपारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये विजय मसनकर (33), सागर काळे (30), दोन्ही रा. कारंजा आणि पिंपरी फॉरेस्ट येथील अक्षय चव्हाण (32) अशी अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेजण दुचाकीने अमरावतीकडे केटर्सचे काम करण्याकरिता दुचाकीने निघाले होते. संभाजीनगर नागपूर महामार्गाने जात असताना सावळकर चौकात भरधाव डंपरने यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक बसताच डंपरच्या समोरील चाकामध्ये दुचाकी अडकल्याने डंपरने दुचाकीला फरपटत नेले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत.