। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई क्रिकेटसाठी प्रतीक्षेत असलेल्या ट्वेन्टी-20 लीगचे पुनरुज्जीवन होणार आहे. यंदाची स्पर्धा 27 मेपासून खेळवण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेने घेतला आहे. मुंबई ट्वेन्टी-20 लीग गेल्या काही वर्षात कालावधी न मिळाल्यामुळे होऊ शकली नव्हती, यंदा राष्ट्रीय ट्वेन्टी-20 स्पर्धेचे विजेतेपद मुंबईने मिळवले होते. मुंबई टी-20 लीग मुंबई तसेच बृहन्मुंबई परिसरातीलही सर्वोत्तम खेळाडूंना व्यासपीठ उलब्ध करून देईल, असे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांचे म्हणणे आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अपेक्स कॉन्सिलच्या बैठकीत मुंबईतील क्रिकेटच्या विकासाला गती देण्यासाठी, युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि क्रिकेटची पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले.
युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळावा आणि त्यांना उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक सामने खेळता यावेत, यासाठी एमसीए काही उदयोन्मुख खेळाडूंना लंडन दौर्यासाठी निवडणार आहेत.
विद्यापीठाच्या सहकार्याने पदवी शिक्षण
एमसीए आता मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने क्रिकेटपटूंसाठी खास रचना केलेला पदवी शिक्षण कार्यक्रम सुरू करीत आहे. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर भर दिला जाईल, ज्यामुळे युवा क्रिकेटपटूंना व्यावसायिक स्तरावर खेळण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतील. क्रिकेटसह शैक्षणिक पात्रता मिळविण्यासाठी ही एक उत्तम संधी असेल.
ठाणे जिल्ह्यात नवीन क्रिकेट अकादमी
मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठाणे जिल्ह्यात नवीन क्रिकेट अकादमी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे महापालिकेने एमसीएला भाडेपट्टीवर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबईतील क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. युवा खेळाडू घडवणे, पायाभूत सुविधा सुधारणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळवून देणे या उद्देशाने हे निर्णय घेतले आहेत. उपक्रमांचा मुंबईतील क्रिकेटपटूंना मोठा फायदा होईल.
– अजिंक्य नाईक, एमसीए अध्यक्ष