। रायगड । जिल्हा प्रतिनिधी ।
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणारी एसटी बस मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथे शनिवारी (दि.12) सकाळी रस्त्यातच बंद पडली. बोरीवलीहून निघालेल्या गणेशभक्तांच्या प्रवासाला बिघाडाचा मोठा फटका बसला. त्यामुळे कित्येक तास प्रवाशांना रस्त्यातच ताटकळत राहण्याची वेळ आली. एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना सोमवारी (दि.14) होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासह सजावटीसाठी गणेशभक्त त्यांच्या मूळ गावी एसटी बसने निघाले. बोरीवलीहून राजापूरला निघालेली ग्रुप बुकिंगची एसटी शनिवारी नागोठणे येथेच बंद पडली. बसची अवस्था खराब असल्याने लहान मुले, महिला आणि वयस्कर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात एसटीच्या बसेस रस्त्यातच बंद पडत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली. यापूर्वी नागोठणे उड्डाणपुलाजवळ सर्विस रोडवर एसटी बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पैसे भरूनही खराब बस मिळत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. राजकीय पक्षांनी बुकींग केलेल्या बसेस चांगल्या दिल्या जात असल्याचा आरोपही प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील एसटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया उमटली जात आहे.
