रायगडात 19 निलंबन

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

एसटी कर्मचारी संघटनांनी तीन दिवसांपासून सुरु केलेल्या बेमुदत संपामुळे रायगडातील आठही आगारातील एसटी सेवा पूर्णपणे कोलमडली असून, बुधवारी एकही एसटी कोणत्याही आगारातून सुटली नाही. कामावर हजर न होणार्‍या कर्मचार्‍यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. आज 19 जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
चालक, वाहक आणि यांत्रिकी विभागातील कर्मचार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. एसटी कर्मचार्‍यांचे सरकारी सेवेत विलिनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी सुरु असलेले आंदोलन अद्यापही मिटलेले नाही.याचा मोठा परिणाम रायगडातील एसटी वाहतुकीवर झालेला आहे.खाजगी वाहतूक सेवा मात्र जोमात सुरु झालेल्या आहेत.सरकानेच खाजगी वाहतूकदारांना आगारातमधूनच प्रवासी वाहतूक करण्याची अनुमती  दिल्याने सध्या एसटी ऐवजी अनेक आगारात खाजगी बसेस उभ्या असल्याचे दिसत आहे.
खाजगी वाहतूकदारांनी एसटीच्या दरातच प्रवासी वाहतूक करावी,असे स्पष्ट निर्देश सरकारचे असताना देखील खाजगी वाहतूकदार मात्र मनमानी करीत सर्रासपणे जादा भाडे आकारताना दिसत आहेत.याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
दरम्यान,बुधवारी आठही आगारातून एकही एसटी सुटली नसल्याची माहिती विभागीय नियंत्रण अनघा बारटक्के यांनी दिली.

Exit mobile version