नेरळ-कळंब मार्गावरील एसटीची सेवा बंद; प्रवाशांची गैरसोय

| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु असल्याने गेली अनेक महिने या भागातील एसटी सेवा बंद आहे. त्याबाबत रस्त्याची अडचण सोडविण्याचा प्रयत्न स्थानिक कार्यकर्त्यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या माध्यमातून एसटी गाडी जाण्यासाठी मार्ग तयार झाला असून या मार्गावर एसटी सुरु करण्यासाठी कर्जत एसटी आगार प्रमुख यांच्या निर्णयाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचे काम मंजूर होते. त्यातील डांबरीकरणाचे काम जानेवारी महिन्यात पूर्ण झाले असून नेरळ कोल्हारे येथील साई मंदिर ते धामोते या भागातील रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविला जाणार होता.

प्रवाशांच्या सेवेत एसटी सर्वत्र असताना नेरळ-कळंब मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी एसटी आगार प्रमुख शंकर यादव यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने गाडी चालवता येत नाही, अशी करणे दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारांना भेटून मार्ग काढण्याचे सुचविले. त्यानंतर एसटी आगार प्रमुख यांनी गाडीची चाचणी घेतली. यशस्वी चाचणी झाली. केवळ 40 मीटर रस्ता खडी टाकून तयार करून देण्याची सूचना केली होती. त्यानुसार एसटी जाण्यासाठी खडी टाकून रस्ता तयार करण्याचे काम ठेकेदार कंपनीकडून करण्यात आले. मात्र अद्यापही बस सेवा सुरु करण्यात आली नाही.

Exit mobile version