धाटावमध्ये रंगणार कुमार- मुली राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा

| धाटाव । वार्ताहर ।
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे रोहा तालुक्यातील धाटावमध्ये परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालयात 8 ते 11 डिसेंबर रोजी स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर आयोजित 48 व्या कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाचा प्रचार आणि प्रसार करीत या खो खोच्या खेळाबाबतची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रायगड खो खो असोसिएशनचे जिल्ह्याध्यक्ष अनिकेत तटकरे यांनी केले. यावेळी विजय मोरे, अलंकार कोठेकर, प्रीतम पाटील, स्नेहा ताडकर, अनंत मगर, अमित मोहिते, सतीश भगत, महेश बामुगडे, अंकुश ताडकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

याठिकाणी 24 संघ मुलांचे व 24 संघ मुलींचे असून प्रत्येक संघात 15 खेळाडू असतील यात एकूण 125 खेळाडू खेळतील,त्याचप्रमाणे पंच कमिटी,नियोजन समिती असेल. सकाळ- सायंकाळी अशा दोन सत्रात या स्पर्धा होणार असून येणार्‍या खेळाडूंची निवास व्यवस्था केली जाणार आहे. याठिकाणी चार क्रीडांगण असून गॅलरी मध्ये अंदाजे दोन हजार क्रीडारसिक आनंद घेतील असे उत्तम नियोजन करण्यात येणार आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.

Exit mobile version