। माणगाव । वार्ताहर ।
महामहीम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांचे कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य आंतर-विद्यापीठ आविष्कार स्पर्धा 2025 चे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड येथे दिनांक 12 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकातून दिली.
आविष्कार ही राज्यव्यापी आंतर-विद्यापीठ संशोधनावर आधारित स्पर्धा असून या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील एकूण 26 विद्यापीठांचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी एकूण 1000 पेक्षा अधिक नवकल्पक विद्यार्थी व 200 पेक्षा अधिक विद्यापीठ प्रशिक्षक सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा सहा वेगवेगळया श्रेणींमध्ये आयोजित केली जाणार आहे. मानवता भाषा आणि ललितकथा, वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा, शुद्ध विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधे आणि फार्मसी, कृषी आणि पशुसंवर्धन आविष्कार या स्पर्धेसाठी राज्यपाल कार्यालय राजभवन यांनी नियुक्त केलल्या निरीक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली दहा निरीक्षक निवडलेले असतात तसेच राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ, संशोधक व इतर मान्यवर यांचा परीक्षक म्हणून सहभाग असतो. विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्राध्यापक डॉ. कारभारी काळे, यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजनाची तयारी सुरु आहे.
आविष्कार ही स्पर्धा राजभवन कार्यालयातून 2006-07 शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली असून, या स्पर्धेचा मूळ उद्देश विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करणे, तसेच विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्राथमिक संधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे हे आहेत. विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देवून त्यांना प्रोत्साहन मिळविण्यासाठी शिष्यवृत्तीचा देखील समावेश आहे.