बीसी सोशल फौंडेशन, शिवशक्ती अजिंक्य; आकाश रूडले, अपेक्षा टाकळे सर्वोत्तम
| मुंबई | प्रतिनिधी |
बंड्या मारुती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत नांदेडच्या बाबुराव चांदेरे फौंडेशनने पुरुषांत, तर मुंबई शहराच्या शिवशक्ती संघाने महिलांत विजेतेपद पटकाविले. स्वस्तिकचा आकाश रूडले पुरुषांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रु. पंचवीस हजार देऊन गौरविण्यात आले. तर शिवशक्तीची अपेक्षा टाकळे महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला रोख रु. पंधरा हजार देऊन सन्मानित करण्यात आले.
ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे संपन्न झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने उपनगरच्या स्वस्तिक मंडळाचा प्रतिकार 35-19 असा सहज मोडून काढत आमदार चषक व रोख रु. एक लाख आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या स्वस्तिकला चषक व रोख रु. पासष्ट हजार वर समाधान मानावे लागले.

महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या शिवशक्ती महिला संघाने उपनगरच्या महात्मा गांधी स्पोर्ट्सचा 39-18 असा सहज पाडाव करीत आमदार चषक व रोख रु. पासष्ट हजारांचा धनादेश आपल्या नावे केला. उपविजेत्या महात्मा गांधीला चषक व रोख रु. पंचेचाळीस हजार प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, पुण्याचे बाबुराव चांदेरे, स्पर्धा निरीक्षक रवींद्र देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.