वरसोली समुद्रकिनारी अलिबाग पोलिसांची कारवाई; परराज्यातील इसम ताब्यात
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी वरसोली समुद्रकिनारी आलेल्या परराज्यातील इसमाला अलिबाग पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 लाख 68 हजार 100 रुपयांचे 7.66 ग्रॅम हेरॉईन आणि 50 हजार रुपयांचा 2.06 किलो गांजा, असा एकूण 3 लाख 18 हजार 100 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) रात्री करण्यात आली.
अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांना गांजा व हेरॉईनचा साठा घेऊन एक इसम वरसोली समुद्रकिनारी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून सायंकाळीच वरसोली समुद्रकिनारी पाठविले. रात्री साडेनऊच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणारा इसम पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, तपकिरी रंगाच्या हेरॉईनची 65 पाकिटे आणि 2.06 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण साठा जप्त केला.
ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव रामविनय प्रसाद रामस्वरुपदास यादव (46) रा. बिहार असे आहे. त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अंमली पदार्थांचा साठा नेमका कोठून आणण्यात आला, तसेच यामागे मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, आरोपीला शुक्रवारी (दि. 31) दुपारी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत कदम करीत आहेत.






