| मुंबई | प्रतिनिधी |
शिना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला भारत सोडून जाता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील आदेश पारित केली आहेत. यापूर्वी सत्र न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी हिला परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने अपील दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी हा निकाल दिला आहे. इंद्राणी मुखर्जी हिच्यावर तिची मुलगी शिना बोरा हिचा खून केल्याचा आरोप आहे. खुनाची ही घटना 2012ला घडली होती. इंद्राणी मुखर्जीला याप्रकरणी जामीन मिळालेला आहे. त्यानंतर तिने परदेशात जाण्याची परवानगी मागितली होती. तिला तीन महिन्यांच्या कालावधीत दहा दिवस लंडन आणि स्पेनमध्ये जाण्याची परवानगी सत्र न्यायालयाने दिली होती. लंडनमधून इंद्राणीच्या वकिलांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. मृत्युपत्रात दुरुस्ती करणे, करासंदर्भातील विषय आणि बँकेतील जॉईंट खाते पुन्हा सुरू करणे अशा कामांसाठी तिला या परदेशात जावे लागणार आहे, असे तिच्या वकिलांनी म्हटले होते. पण सीबीआच्या वकिलांनी सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या निकालावर आक्षेप नोंदवले. इंद्राणी हिला या कामांसाठी परेदशात जाण्याची गरज नाही, कारण यांची पूर्तता ती भारतातून करू शकते, असे वकिलांनी सांगितले.