ग्रामपंचायतीचे दस्तऐवज गायब करण्याचा प्रयत्न
सदस्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस
वाकण | वार्ताहर |
ऐनघर ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे व त्यांची चौकशी सरकारी दरबारी प्रलंबित असतानाच ऐनघर ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तऐवज गायब करण्याचा निष्फळ प्रयत्न ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांनी शुक्रवार, दि. 27 ऑगस्ट रोजी केला. मात्र, ग्रामपंचायतीचे जागरूक सदस्य किशोर नावले व प्रकाश डोबळे यांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. यामुळे ग्रामपंचायतीचे दस्तऐवज गायब होण्यापासून वाचले असले तरी हा प्रकार गंभीर असल्याने ऐनघर पंचक्रोशीत खळबळ निर्माण झाली आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना ग्रा. पं. सदस्य प्रकाश डोबळे व किशोर नावले यांनी सांगितले की, ऐनघर ग्रामपंचायतीच्या विकास कामांसंदर्भातील महत्वाचे दस्तऐवज असलेले दफ्तर ग्रामविकास अधिकारी राजू ढेरे यांच्या आदेशाने व लेखनिक उत्तम जाधव यांच्या सहकार्याने कर्मचारी सुरेश सुटे व राजेंद्र जाधव मोटारसायकलवरून 27 ऑगस्टला लंपास करून नेत असताना त्यांना ऐनघर फाट्याजवळ दुपारी तीन वाजता रंगेहाथ पकडले. त्यामुळे ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच कलावती राजेंद्र कोकळे व इतर सर्व सदस्य अत्यंत संतप्त झाले. त्यांनी ग्रामविकास अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
या पत्रकार परिषदेस सरपंच कलावती कोकळे यांचे पती राजेंद्र कोकळे, सदस्य रोहिदास लाड, किशोर नावले, प्रकाश डोबळे, सचिन भोसले, विनोद निरगुडे, विठ्ठल इंदुलकर, जगन कोकळे, जितेंद्र धामणसे, भगवान शिद, लक्ष्मण मोहिते, खेळू खांडेकर, महादेव करंजे, नारायण मोहिते, ऐनघर शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप मोहिते, सुकेळी शाखाप्रमुख किशोर तेलंगे, भास्कर लाड, राजू जंगम, भास्कर बावदाने, आवेश कोकळे, सुरेश वाघमारे, ज्ञानेश्वर जवके, हेमंत शिरसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दफ्तरामध्ये 14 वा वित्त आयोग साठा रजिस्टर, ग्रामनिधी साठा रजिस्टर, न.बं 6 वर्गीकरण फाईल, नोकर पगार रजिस्टर, व्हावचर फाईल नंबर 1, व्हावचर फाईल नं. 2, मासिक सभा प्रोसिडिंग, सॅनिटायझर वाटप फाईल, प्राथमिक शाळा/ अंगणवाडी साहित्य वाटप 10% रजिस्टर, प्राथमिक शाळा टेबल-खुर्ची -कपाट वाटप फाईल, 14 वा वित्त आयोग फाईल, ट्युब साठा रजिस्टर, कोरोना संसर्ग मास्क वाटप रजिस्टर( 1 ते 7), ग्रामनिधी विकासकामे फाईल (1 ते 24) आदी दस्तऐवजांचा समावेश होता.