खोपटा गावातील 13 जणांना चावा
। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून, खोपटा गावातील 13 नागरिकांना चावा घेतल्याची घटना रविवारी (दि.30) घडली आहे. या घटनेतील सहा जखमी नागरिक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात, तर सात रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तरी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
तालुक्यातील अनेक गावात भटक्या कुत्र्यांची संख्या बळावली आहे. सदर भटकी कुत्री नागरिकांना चावा घेत आहेत. त्यामुळे गावागावातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत वावरताना दिसत आहेत. त्यातच रानसई आदिवासी गावातील रहिवाशांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने एकचा दुदैवी मुत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच जेएनपीए वसाहतीत डॉक्टर व रहिवाशांना कुत्रा चावला होता. तसेच नुकताच आवरे गावाजवळील जंगलात मुक्त संचार करणाऱ्या भेकर जातीच्या वन्यप्राण्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.
खोपटा गावातील कुत्र्यांचा उच्चांक वाढला आहे. या कुत्र्यांनी 13 जणांना चावा घेतला आहे. तरी खोपटा गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनी केली आहे.