एसटीची स्मार्टकार्ड योजना बारगळी

| अलिबाग | प्रमोद जाधव |

एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी एसटी महामंडळाने हायटेक होत कागदी ओळखपत्राच्या जागी स्मार्टकार्डची योजना सुरु केली होती. मात्र, ‌‘नव्याचे नऊ दिवस’ या उक्तीप्रमाणे एसटी महामंडळाचा कारभार समोर आला आहे. गेल्या आठ वर्षांपूर्वी सुरु झालेली स्मार्टकार्डची योजना बंद पडली असून, जुन्याच पद्धतीने ओळखपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही स्मार्ट कार्डची योजना बारगळल्याचे चित्र आहे.

पूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करताना, तहसील कार्यालयातील मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाखल्याच्या आधारे एसटीची सवलत मिळत होती. त्यानंतर आधारकार्डमार्फत सवलत देण्यास सुरुवात केली. मात्र, हे कार्ड हाताळताना गहाळ होण्याची भीती अधिक होती. त्यात खराब होण्याची शक्यताही होती. एसटी महामंडळाने 65 वर्षे पूर्ण असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र म्हणून स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील प्रत्येक बस आगारातील आरक्षण कक्षामध्ये त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा सुरु केली. स्मार्टकार्ड नोंदणी केल्यानंतर एक ते दोन महिन्यांनंतर स्मार्टकार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. एसटी महामंडळाच्या या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. जिल्ह्यातील एसटी बस आगारातील आरक्षण कक्षात स्मार्टकार्ड नोंदणीसाठी गर्दी होऊ लागली. स्मार्टकार्डच्या आधारे ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध झाली. तसेच एसटीतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य पासधारक प्रवाशांनादेखील स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात केली. कागदी पासच्या जागी स्मार्टकार्ड आल्याने विद्यार्थी व अन्य प्रवासीदेखील आनंदी झाले होते. परंतु, हा आनंद फार काळ टिकला नाही. गेल्या वर्षभरापासून ही योजनाच बारगळी असल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या कंपनीला स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम दिले होते, त्याच कंपनीच्या तांत्रिक कामांमध्ये बिघाड झाला आहे. सर्व्हरची समस्या निर्माण झाल्याने ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना नव्याने स्मार्ट कार्ड काढता येत नाही. तर, मुदत संपलेल्या स्मार्ट कार्डचे नूतनीकरणही करता येत नाही. एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सध्या ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डच्या व विद्यार्थ्यांना कागदी पासच्या भरोवशावरच प्रवास करावा लागत आहे.

कारभाराबाबत नाराजी
2016 पासून स्मार्ट कार्ड योजना सुरु केली. एटीएम कार्डसारखे अद्ययावत असे स्मार्टकार्ड हेच विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व अन्य पासधारकांसाठी एसटीचे ओळखपत्र बनले. सदर ओळखपत्र स्कॅन करुन त्याची नोंदणी मशीनमध्ये केली जात होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून स्मार्ट कार्ड मिळणे बंद झाले आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांना सध्या कागदी पासचा आधार घ्यावा लागत आहे. एसटी महामंडळाच्या या कारभाराबाबत प्रवाशांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.

गेल्या वर्षभरापासून स्मार्ट कार्ड येणे बंद झाले आहे. दरवेळी त्यासाठी मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डद्वारे एसटीतून प्रवास करण्याची व्यवस्था केली आहे. सध्या जुन्याच पद्धतीने कामकाज करण्याच्या सूचना असून, त्यानुसार ते सुरू आहे. स्मार्ट कार्ड का बंद आहेत, याची माहिती अद्याप वरिष्ठ पातळीवरुन मिळालेली नाही.

दीपक घोडे, विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ, रायगड विभाग

प्रवाशांचे पैसे पाण्यात
स्मार्टकार्ड नोंदणी नूतनीकरण थांबल्याने ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थी व नियमित एसटीतून प्रवास करणाऱ्या पासधारक विद्यार्थ्यांना कागदी पासवरच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हे पास खराब व गहाळ होण्याची भीती निर्माण झाली आहे. स्मार्टकार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांना 50 रुपये खर्च करावे लागले होते. ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे पैसे पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

हजारो प्रवासी स्मार्टकार्ड विना
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसह हजारो विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 25 हजार आणि विद्यार्थ्यांना दोन हजार 300 स्मार्टकार्ड वितरीत केल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून ही योजना बारगळ्याने हे प्रवासी स्मार्टकार्डविना असल्याचे चित्र आहे.

एसटी महामंडळाने सुरु केलेली स्मार्टकार्ड योजना खूप चांगली होती. परंतु, गेल्या वर्षभरापासून ती बंद असल्याने कार्ड काढून काहीच उपयोग झाला नाही. काहींनी नोंदणी करूनही त्यांना स्मार्टकार्ड मिळाले नाही.

वनराज चव्हाण, ज्येष्ठ नागरिक
Exit mobile version