| पुणे | प्रतिनिधी |
एका 21 वर्षीय विद्यार्थ्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उडी मारल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.24) रोजी सायंकाळी 6 वा.च्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवर एका 21वर्षीय तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने मेट्रो स्टेशनवरून उडी घेतली. उडी घेतल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनाने त्याला चिरडले. सुजल संजय मानकर असे मृत तरूणाचे नाव आहे. सुजल मानकर डीवाय पाटील कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सोमवारी सायंकाळी तो संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर चढला आणि थेट रस्त्यावर उडी मारली. रस्त्यावर पडल्यानंतर त्याला एका वाहनाने चिरडले. मुलाला गाडीने चिरडल्यानंतर स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला तातडीने वायसीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्याने कुटुबांच्या आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.