| नाशिक | प्रतिनिधी |
लायब्ररीत पुस्तक आणायला गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने कट मारल्यानंतर पाणीपुरीच्या गाडीला धडक बसल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे. वेदांत गुळसकर असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत हा सोमवारी (दि.24)सायंकाळी 5.30 वाजता दुचाकीने लायब्ररीमधून पुस्तक घेऊन घरी जात होता. यावेळी वडाळा-पाथर्डी रोडवर पाठीमागून अनोळखी वाहनाने दुचाकीला कट मारली. यामुळे दुचाकीवरील वेदांतचा तोल गेल्याने त्याची दुचाकी रस्त्याच्या खाली उतरली. दुचाकीचा वेग अधिक असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन त्याची दुचाकी आदळली. या अपघातात वेदांतच्या मानेत दोन्ही बाजूने काचा घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अतिरक्तस्राव सुरू असल्याने त्याला उचलण्याची कोणी हिंमत केली नाही. त्याच वेळेस एक पोलीस वाहन जात असताना कर्मचाऱ्यांनी जखमी वेदांतला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. वेदांतवर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवननगर येथील मराठा हायस्कुल येथे तो शिक्षण घेत होता. दहावीचा पहिला पेपर त्याने दिला होता. दुसऱ्या पेपरच्या अभ्यासाकरिता तो लायब्ररीमध्ये पुस्तक घेण्यास गेला होता आणि यातच या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.