| पनवेल | प्रतिनिधी |
कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या मारामारीत विद्यार्थी जखमी झाला. याप्रकरणी प्रणव पिंगळे याच्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गणेश भवानी पंडा हा मल्हार आपारमेंट, शेडुंग पनवेल येथे राहात असून, एप्रिल महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी पनवेल शेडुंग टोल नाक्याजवळ कॉलेजला गेला असता वर्गातील प्रणव पिंगळे याने त्याला चिडवायला सुरुवात केली. त्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी झाल्यानंतर सर्व मुले जेवण करण्यासाठी बसले, यावेळी प्रणव पिंगळे याने त्याला धक्काबुक्की केली आणि पाठीमागून येऊन धक्का मारून चापट मारली आणि गळा दाबला. त्यानंतर डावा हात पिरगळला आणि छातीवर लाथा मारल्या. यात गणेश खाली पडला. त्यानंतर गणेशने आईला फोनवर पडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तक्रार करू नका, असे प्रणवच्या आई-वडिलांनी सांगितले, मात्र मे महिन्यात पुन्हा जास्त त्रास झाल्याने डॉक्टरांनी त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर असून, ऑपरेशन करणे गरजेचे सांगितले. यावेळी प्रणच पिंगळे यांच्या आई वडिलांना याबाबत कळविले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रणव पिंगळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.