विद्यार्थिनींनी साधला ज्येष्ठांशी संवाद

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय वांगणी शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला. आजूबाजूच्या गावातील जेष्ठ नागरिकांची मुलाखत घेतली. व तब्बल 75 वर्षांचा कालखंड उलगडला.

इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक टिळक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरातील आमडोशी, वांगणी व बाळसई या गावातील वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती त्यांच्या घरी जाऊन घेतल्या. या जेष्ठ नागरिकांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 75 वर्षांनंतरचे ग्रामीण जीवन व त्यामधील विविध स्थित्यंतरे जाणून घेतली. या विद्यार्थ्यांनी आमडोशी गावातील रामदास गणपत जांबेकर (वय 78), वांगणी गावातील दगडू कृष्णा दळवी (वय 76), बाळसई गावातील शांताराम गणपत भोसले (वय 76) विठोबा धर्मा तेलंगे (वय 80), गोपाळ दगडू म्हसकर (वय 78) व त्यांच्या पत्नी राधिका गोपाळ म्हसकर (वय 75), वसंत शंकर भोसले (वय 75) या जेष्ठ नागरिकांच्या मुलाखती घेतल्या .

या मुलाखतीतून विद्यार्थ्यांनी 75 वर्षांपूर्वीचे ग्रामीण समाजजीवन व त्यातील स्थित्यंतरे, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या गावातील स्वातंत्र्य सैनिकांची माहिती, गावातील लोककला व कलाकार, जलस्रोत, पारंपरिक उत्सव – जत्रा, मौखिक परंपरा, अर्थकारण, शेती , प्राणीजीवन, दुष्काळी परिस्थिती , महापूर , दळणवळणाची साधने, उदरनिर्वाहाची साधने , गावातील पारावरचे न्यायनिवाडे, पारंपरिक खेळ, पाऊलवाटा, शेतीची अवजारे, दुधदुभते, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष इत्यादी बाबींची सविस्तर माहिती घेतली .
त्याकाळी असलेल्या गावातील एकोप्याचा सर्वच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या मुलाखतीतून अभिमानाने उल्लेख केला आणि गावातील हरवत चाललेल्या माणुसकी विषयी खंत व्यक्त केली. तसेच रोजगार व नोकरीनिमित्ताने शहरात स्थलांतरित होऊन गावाशी नाळ तुटलेल्या नवीन पिढीविषयी चिंताही व्यक्त केली . त्या काळी आलेल्या दुष्काळाच्या आठवणी सांगताना या जेष्ठ नागरिकांच्या डोळ्यात पाणी तरळले .

या जेष्ठ नागरिकांच्या मुलाखतींच्या मालिकेतून कुमार वयातील 15 वर्षांच्या मुलांना 75 वर्षांचा ग्रामीण समाजजीवनाचा इतिहास समजला आणि भविष्यात अधिक चांगले काम करण्याची प्रेरणाही मिळाली. तसेच तीन ते चार पिढ्यांमधील अंतर कमी होण्यास मदत झाली. जेष्ठ नागरिकही सुखावले होते. असे या उपक्रमाचे निर्माते शिक्षक टिळक खाडे यांनी सांगितले.

Exit mobile version