विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षेकडे

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
शिक्षक भरतीसाठी टीईटी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेचा निकाल अवघा एक ते दोन टक्के लागत आहे. शिवाय गेली दहा वर्षे शिक्षक भरती रखडली आहे. दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून अनेकांना नोकरी नसल्याने युवकांनी डी. एड.साठी प्रवेश घेणे बंद केले आहे. जिल्ह्यातील चार डी.एड महाविद्यालयात 240 प्रवेश क्षमता असताना अवघे 78 अर्ज आले असून, अन्य विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम राज्यभरात सुरू आहे. सुरूवातीला डीएड नंतर डीटीएड सध्या डीएलएड या नावाने अभ्यासक्रम सुरू आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक नोकरीची हमखास संधी होती.

त्यामुळे डीएड विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असे.मात्र,सध्या शिक्षक भरतीच बंद असल्याने लाखो विद्यार्थी डी.एड वा बी.एड होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातही नोकरीसाठी सीईटी,टीईटीसारख्या परीक्षांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, तरीही शिक्षक भरतीबाबत अनिश्‍चितता आहे.2011 नंतर 2017 ला पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्यात आली. मात्र,त्यावेळी निम्मी भरती झाली नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. आता डी.एड ऐवजी बारावीनंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली आहे.

Exit mobile version