अपंग व्यक्तीच्या सायकलला भर रस्त्यात दिला आधार
। पनवेल । वार्ताहर ।
पोलीस म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे केवळ एक कर्तव्यकठोर व्यक्तिमत्त्व. मात्र या पोलीसी वर्दीमध्ये एक मायाळू आणि कनवाळू देवदूत देखील दडला असल्याचा प्रत्यय पनवेलकरांना आला. मंगळवारी (दि.22 मार्च) संध्याकाळी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन पनवेल सिग्नल पॉईंट जवळ आपले कर्तव्य निभावत असलेले पोलीस हवालदार गावडे यांना एक अपंग व्यक्ती त्यांच्या तीन चाकी सायकलवरून उड्डाणपुलावरून जात असल्याचे दिसले. सदर व्यक्तीला नवीन पनवेल उड्डाणपुलावरील चढण पार करताना त्रास होत होता. त्या अपंग व्यक्तीची दमछाक पाहून पोलीस हवालदार गावडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता अपंग व्यक्तीच्या मदतीला धावून गेले.
सदर अपंग व्यक्तीच्या तीन चाकी सायकलला चढण पार होईपर्यंत धक्का देऊन उड्डाणपूलाच्या एका बाजूने दुसर्या बाजूपर्यंत जाण्यास गावडे यांनी सहाय्य केले. त्यावेळी त्यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. त्यामुळे पोलिसांच्या अशाही माणुसकीचा प्रत्यय पनवेलकरांना आला. पोहवा गावडे यांच्या या आदर्श कृतीमुळे नवी मुंबई पोलीस दलाबद्दल लोकांमधून अतिशय चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. वरिष्ठांनी देखील गावडे यांचे कौतुक केले आहे.