नुकसान भरपाईची मागणी
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील चिंबोड घोटवडे येथे वीज कोसळून दुर्घटना घडलीय. शेतकरी भागू दगडू झोरे यांची गुरे चरण्यासाठी गेले असता अचानक म्हैस व रेड्याच्या अंगावर वीज कोसळली, या दुर्घटनेत म्हैस व रेडा जागीच ठार झाले. ज्या ठिकाणी वीज कोसळली तेथील झाड ही जळून खाक झाले.
घटनेची खबर पोलीस पाटील वामन सुतक व माजी सभापती पिठू डुंमना यांनी पोलीस व प्रशासनाला दिली. त्यानंतर घटनास्थळी जांभुळपाडा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत कोकरे, तलाठी अनंत वारगुडे, संजय बुरंबे, माजी सभापती पिठू डुंमना, वामन सुतक, योगेश मोरे, यमा डुंमना यांनी जाऊन वस्तुस्थिती ची पाहणी केली. याठिकाणी अनेक गुरे चरण्यासाठी गेली होती, मात्र वीज या दोन गुरांवर पडली आणि ती गुरे दगावली. या दुर्घटनेत दुभती म्हैस तसेच रेडा जागीच मृत्युमुखी पडल्याने शेतकरी भागू दगडू झोरे यांचे मोठे नुकसान झाली असून प्रशासनाने पंचनामे करून जलद नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केलीय.