प्रेम प्रकरणातून प्रियकराची आत्महत्या

। लोणावळा । प्रतिनिधी ।

चाकणमधील 27 वर्षीय तरुणाने प्रेम प्रकरणातून लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती या तरुणाचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीत आढळला आहे. धक्कादायक म्हणजे सूर्यकांतने जीवन संपवण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवला होता. याच व्हिडिओद्वारे आणि लोकेशनवरून लोणावळा शिवदुर्गच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मृतदेहाचा शोध घेऊन बाहेर काढला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत प्रजापती या 27 वर्षीय तरुणाचे चाकणमधील तरुणीबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. प्रियकर सूर्यकांतला त्याच्या प्रेयसीचं दुसर्‍या तरुणाशी प्रेमप्रकरण असल्याचा संशय होता. याच संशयामुळे नैराश्यात असलेला सूर्यकांत 9 ऑक्टोबर रोजी घर सोडून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. सुर्यकांत दुसर्‍या दिवशीही घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी चाकण पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर सूर्यकांतचं शेवटचं लोकेशन हे लोणावळा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. सूर्यकांतला शोधण्याचं मोठं आव्हान पोलीस आणि शिवदुर्गच्या पथकापुढे होतं. लोणावळा शिवदुर्ग पथकदेखील यावरून लोकेशनची जुळवाजुळव करत होतं. अखेर तो व्हिडिओ राजमाची येथील असल्याचं समोर आलं. व्हिडीओमध्ये पाठीमागे दिसत असलेला भाग तिथला असल्याचं स्पष्ट झालं. अखेर पुन्हा शोध मोहीम सुरू केली.

दरीत काही फुटांवर सूर्यकांतचा मोबाईल दिसला. आणखी खाली गेल्यानंतर मृतदेहाची दुर्गंधी आली. मृतदेह त्याचा असल्याचं निश्‍चित झालं. राजमाची दरीत तब्बल 370 फुटांवर सूर्यकांतचा मृतदेह आढळला. सात दिवसांनंतर सूर्यकांतचा शोध लागला होता. प्रेम प्रकरणातून सूर्यकांतने आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. शिवदुर्गचे सुनील गायकवाड यांच्या पथकाने त्याचा मृतदेह शोधला. सूर्यकांतने उचललेले पाऊल त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर, परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहे.

Exit mobile version