| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतंच शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे गट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं आहे. या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर या प्रकरणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व 40 आमदारांना नोटीस जारी केली.
सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर निर्णय होईल.
सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. या दोन आठवड्यात शिंदे गटाच्या आमदारांना आपलं म्हणणं मांडण्याचं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणातील पुढची सुनावणी 15 दिवसांनी होईल. सुनावणीची निश्चित तारीख आत्ताच सांगता येणार नाही, कारण तशी तारीख सांगण्यात आलेली नाही. पण 15 दिवसांनी सुनावणी होणार, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.