एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक; विश्वकरंडकात भारतीय नेमबाजांचे वर्चस्व
। लिमा । वृत्तसंस्था ।
पॅरिस ऑलिंपिकमध्ये 2 पदके पटकावणारी मनू भाकर हिला नेमबाजी विश्वकरंडकात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. भारताची 18 वर्षीय सुरुची इंदर सिंग हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावताना मनू भाकरला मागे टाकले. या प्रकारात भारतीयांनी 2 पदके पटकावत वर्चस्व गाजवले आहे.
सुरुची इंदर सिंग हिने अंतिम फेरीत 243.6 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मनू भाकर हिने 242.3 गुणांसह रौप्यपदक पटकावले. चीनच्या याओ कियानशून हिने 219.5 गुणांसह कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे. दरम्यान, अंतिम फेरीआधी पात्रता फेरी पार पडली होती. त्यामध्ये प्रत्येक खेळाडूला 60 शॉटमधून आपले कौशल्य दाखवायचे होते. सुरुची हिने 582 गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते. तर, मनू 578 गुणांसह चौथ्या स्थानी होती.
सलग दुसरे सुवर्ण
भारताची युवा नेमबाज सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वकरंडकात सलग दुसरे सुवर्णपदक पटकावण्याची किमया करून दाखवली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेपासून सुरुची अव्वल दर्जाची कामगिरी करीत आहे.
सौरभला कांस्यपदक
भारताच्या सौरभ चौधरी याने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने 219.1 गुणांची कमाई करीत तिसरे स्थान मिळवले. चीनच्या हू केई याने 246.4 गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. तसेच, ब्राझीलच्या वु फेलिप अल्मेडा याने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.
सुरुची हिने याआधीच्या विश्वकरंडकातही छान कामगिरी केली होती. तिच्याकडून दमदार प्रदर्शन झाले. याचा मलाही आनंद आहे. आता तिच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. तसेच, भारतामध्ये एकापेक्षा एक असे अव्वल दर्जाचे नेमबाज तयार होत आहेत, ही महत्त्वाची बाब आहे.
मनू भाकर,
नेमबाज