शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी स्वाध्याय कंपनी कटिबद्ध

गणेश मढवी यांचे प्रतिपादन

| रोहा | प्रतिनिधी |

रोहा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शेतमालावर प्रक्रिया करून शेतकर्‍यांना अधिक लाभ व्हावा, यासाठी प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून, रोहा तालुक्यातील कृषिवलांच्या उन्नतीसाठी स्वाध्याय फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली असल्याचे मनोगत कंपनीचे चेअरमन गणेश मढवी यांनी कंपनी कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप अपसुंदे यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर आत्मा जिल्हा प्रकल्प संचालक सतिश बोराडे, तहसीलदार कविता जाधव, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, कृषी विज्ञान केंद्र किल्ला येथील पाध्ये साहेब, रोहा पं.स. कृषी विस्तार अधिकारी अशोक दांडेकर, विवेकानंद रिसर्च इन्स्टिट्यूटचे सुशील रूळेकर, महाएफपीसी या संस्थेचे जिल्हा समनवयक महेश खांडेकर यांच्यासह कंपनीचे सर्व संचालक उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी कंपनीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कंपनीला सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठी नाबार्ड व 800 पेक्षा अधिक कंपन्या स्थापन करण्याचा अनुभव असणारी महाएफपीसी सारखी संस्था पाठीशी असल्याने कंपनीच्या माध्यमातून उद्योगांची उभारणी होऊन शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्‍वास मान्यवरांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला कंपनीचे चेअरमन गणेश मढवी, सेक्रेटरी संचालक जितेंद्र जोशी, संचालक कांचन माळी, विनायक धामणे, प्रमोटर हेमंत ठाकूर, राम गिजे, अनंत वाघ, संतोष दिवकर, शुभम सरफळे, नंदेश यादव, संदेश विचारे, राजेश सानप, मंगेश ढमाल यांच्यासह कंपनीचे भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version