रोहा तालुक्यात मोफत नेत्र चिकित्सा शिबीर व चष्मे वाटप
| चणेरा | वार्ताहर |
शेकापची बांधिलकी ही सर्वसामान्यांशी आहे. त्यामुळे त्यांच्या मुलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो, असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. रोहा तालुक्यातील खारगाव येथे श्री मारुती मंदिरात चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी करून चष्मे वाटपाचा सामाजिक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 170 महिला व पुरुषांची मोफत नेत्र तपासणी करुन चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा बँकेचे गणेश मढवी, मजूर फेडरेशन अध्यक्ष हेमंत ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदूशेठ म्हात्रे, चणेरा सोसायटीचे चेअरमन गोपीनाथ गंभे, विठ्ठल मोरे, विनायक धामणे, तुकाराम पाखर, हरीचंद्र खांडेकर, विकास भायतांडेल, नंदेश यादव, दत्ताराम पोवळे, गोविंद भायतांडेल, तानाजी म्हात्रे, अमोल शिंगरे, प्रकाश धुमाळ, सदेश विचारे, विलास म्हात्रे, सुबोध देशमुख, लियाकत खोत, नरेश पाटील, नरेंद्र पाटील, प्रियंका गायकर, विद्या गायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यापुढे मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या कि, चाळीशीनंतर चष्मा लागतो. डोळा महत्वाचा अवयव आहे. तो थोडा निकामी झाल्यानंतर डॉक्टरकडे जायचे, नंबर काढायचा, मग चष्मा आणायला जायचं ही प्रक्रिया ज्येष्ठांना खूप कठीण होते. अनेकदा जवळपास डॉक्टर उपलब्ध नसल्याने ही प्रक्रिया खर्चिक होते. ही बाब लक्षात घेऊन शेकापच्या माध्यमातून व कार्यकर्त्याच्या सहकार्याने हे सर्व एका व्यासपीठावर आणले. गावोगावी शिबिरे घेतली. त्यामुळे चष्म्यासारखी एक मूलभूत सुविधा आपण त्यांच्यापर्यंत नेऊ शकलो. आतापर्यंत 60 ते 70 शिबिरे घेतली. त्यांना चांगला प्रतिसादही लाभला आहे. शिवाय नेत्र शस्त्रक्रियाही केल्या आहेत. सर्वसामान्यांच्या मुलभूत समस्या सोडविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
जिल्हा बँकेचे गणेश मढवी मार्गदर्शन करताना म्हणाले की, शेकाप हा गोरगरीब जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने पोहचून कष्टकऱ्यांचे आणि युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवित असतो. मुलींसाठी सायकल वाटप, शेकडो ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, युवकांसाठी नोकरीच्या संधी असे सामाजिक उपक्रम चित्रलेखा पाटील यांनी यशस्वी राबविले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरेश्वर गायकर यांनी केले.