शेडचे पत्र उडाल्याने नागरिकांचे हाल; परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच
| आपटा | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील आपटा गावातील स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानभूमीला असलेल्या शेडवरील पत्रे तुटले आहे, काही उडून गेले आहेत. रात्रीच्या वेळी अंत्यविधी करण्याची वेळ आल्यास याठिकाणी विजेची सोय नसल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. तसेच रात्रीच्या वेळी मद्यपींचे अड्डे बसत असल्याने दारुच्या बाटल्यांचा खच या ठिकाणी दिसून येत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आपटा गावात सर्व जाती-धर्माचे लोक तसेच 14 आदिवासी वाड्यांतील बांधव, ठाकूर, धनगर ग्रामस्थ गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु या सर्वांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात आपटा ग्रामपंचायत अयशस्वी ठरत आहे. मराठी , गवळी , ब्राह्मण ,सोनार वाणी आदी समाजासाठी असणाऱ्या स्मशानभूमीवर लाईटची व्यवस्था करण्यात आलेली नाही. रात्री अपरात्री मयत जळीत करण्यासाठी गेले असता कुटुंब व ग्रामस्थांची हेळसांड होते. स्मशाभूमीतील परिसरात दारूच्या बाटल्या व कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.