उद्यापासून तलाठीपदाच्या लेखी परीक्षा

जागा 241 अन्‌ अर्ज 1 लाख 537; 16 जागा राहणार रिक्त

| रायगड | प्रतिनिधी |

महसूल विभागाचा महत्वाचा दुवा असणाऱ्या तलाठी पायावर आपली वर्णी लागावी यासाठी राज्यभरातून उमेदवारांनी अर्जाचा पाऊस पडला आहे. राज्यात 4 हजार 644 जागांसाठी 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी तलाठी होण्यासाठी आपले अर्ज सादर केले आहेत. यामध्ये रायगड जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रायगड जिल्ह्यातून 241 जागांसाठी तब्बल 1 लाख 537 उमेदवारांनी तलाठी होण्यासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे तलाठी पदाच्या जिल्ह्यातील जागांच्या संख्येत अर्जाची संख्या डोळे विस्फारण्यास लावणारी आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी टीसीएस कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत 19 दिवस असून, ही परीक्षा 3 सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.

रायगड जिल्हा प्रशासनाकडे तलाठ्यांची 510 पदे मंजूर आहेत. यापैकी 253 तलाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत, तर 257 तलाठ्यांची अद्याप जिल्हा प्रशासनाला गरज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची फारच तारांबळ उडते. कामे उरकण्यासाठी त्यांना एकाच पदावरील व्यक्तीकडे दोन-तीन कामांचा अधिक भार द्यावा लागत आहे. एकाच व्यक्तीवर कामाचा जादा ताण येत असल्याने कामामध्ये गुणवत्ता ठेवताना त्यालाही तारेवरची कसरत करावी लागते. ज्यादा कामामुळे अतिरिक्त काम करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबालाही वेळ देता येत नसल्याने त्यांच्या आरोग्यासह मानसिकतेवर परिणाम होत असल्याची खंत काही कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. आता होणाऱ्या तलाठी पदाच्या भरतीमध्ये जिल्ह्याला केवळ 241 तलाठी मिळणार आहेत. असे असले तरी प्रशासनाची गरज या पद भरतीने भागणार नाही. भरतीमधून तलाठी मिळाले तरी 16 तलाठ्यांच्या जागा रिक्तच राहणार आहेत.

केंद्र बदलाची मागणी
राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती घेण्यात येत आहे. मात्र, जादा परीक्षा शुल्क आकारण्यात येत असल्याने आधीच विद्यार्थ्यांनी याला विरोध केला होता. त्यातच आता पुन्हा एकदा तलाठी भरती परीक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. तलाठी भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. मात्र पहिल्याच टप्प्यात परीक्षार्थीचे परीक्षा केंद्रच कुठेच्या कुठे आल्याने गोंधळ उडाला आहे. अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्रच दिले गेले नाही. त्यामुळे हे केंद्र बदलून देण्याची किंवा एसटीचा खर्च देण्याची मागणी केली जात आहे.

परीक्षेच्या नियोजित तारखा
17 ते 22 ऑगस्ट, 26 ते 29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर, 4 ते 6 सप्टेंबर, 8 ते 10 सप्टेंबर, 13 ते 14 सप्टेंबर

Exit mobile version