तारापूर एमआयडीसीचे सांडपाणी समुद्रात

| मुंबई | प्रतिनिधी |

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडले जात असल्याचे आ.जयंत पाटील यांनी लेखी प्रश्नाद्वारे सरकारच्या निदर्शनास आणले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सांडपाणी समुद्रात अंशतः सोडले जात असल्याचे कबुल केले.विधानपरिषदेत. जयंत पाटील, भाई जगताप, श्री.सतेज पाटील,राजेश राठोड, अभिजित वंजारी, डॉ. प्रज्ञा सातव, डॉ. वजाहत मिर्झा, श्री. धीरज लिंगाडे, श्री. सुधाकर अडबाले आदींनी याचबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

येथील 200 हून अधिक रासायनिक कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट किनाऱ्यालगतच्या खाड्यांमध्ये सोडले जात आहे., सदर कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया करून पाईपलाईनद्वारे खोल 7 कि.मी. अंतरावर सोडावे असे आदेश असताना, औद्योगिक वसाहतीमार्फत सदर सांडपाण्याकरीता केवळ 200 फूट अंतरावर पाईपलाईन टाकण्याचे काम करण्यात आले असून, प्रत्यक्षात अजून ही पाईपलाईन कार्यान्वित केलेली नाही,याकडेही या सदस्यांनी लक्ष वेधले.

यावर शिंदे यांनी लेखी उत्तर देताना प्रक्रिया केलेले औद्योगिक सांडपाणी नवापूर येथील अरबी समुद्रामध्ये बंद वाहिनीव्दारे 500 मी. इतक्या अंतरावर सोडण्यात येत आहे. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने सदर सांडपाणी 7.1 कि.मी अंतरावर सोडण्याची शिफारस केली असून त्यानुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बंद बाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. प्रक्रिया केलेले औद्योगिक सांडपाणी समुद्रामध्ये पाईपलाईनद्वारे 7.1 कि. मी. अंतरावर सोडण्यासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्र (सी.आर.झेड) अनुमती देण्यात आली आहे. असे लेखी उत्तरात नमूद केलेले आहे.

Exit mobile version