| पेण | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या विशेषस खोलपुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बी.एल.ओ. प्रशिक्षण सुरू असताना पेण नगरपरिषद शाळेतील शिक्षक आसिफ दळवी यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी अंतोरेफाटा येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण नगरपरिषदेच्या सभागृहात सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान दळवी यांना चक्कर येऊन घाम फुटल्याने ते खाली कोसळले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर शिक्षकांवर सातत्याने सोपविण्यात येणाऱ्या निवडणूक, जनगणना, मतदारपुनरीक्षण, सर्वेक्षण आणि इतर अशैक्षणिक कामांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ”गुरुजींनी विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन करायचे की लोकसंख्या मोजत बसायचे?” असा संतप्त सवाल शिक्षक वर्गातून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याऐवजी विविध शासकीय मोहिमांमध्ये शिक्षक गुंतत असल्याने त्यांच्या अध्यापनावर परिणाम होत असून, मानसिक तणावही वाढत असल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापनाच्या कामासाठी अधिक वेळ मिळावा आणि अशैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करावा, अशी मागणी या घटनेच्या निमित्ताने पुन्हा जोर धरू लागली आहे.







