खासगी बसमध्ये शिक्षिकेच्या दागिन्यांची चोरी

कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

| पनवेल | प्रतिनिधी |

छत्रपती संभाजी नगर येथून खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या एका शिक्षिकेचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने प्रवासादरम्यान चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

मीना हानवते (46) असे या शिक्षिकेचे नाव असून, त्या छत्रपती संभाजी नगर येथे राहतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मीना यांची विवाहित मुलगी कळंबोलीत राहते. त्या पतीसह श्रेयस ट्रॅव्हल्स या खासगी बसने कळंबोली येथे येत होत्या. दरम्यान, त्यांनी त्यांच्यासोबत 2 लाख 56 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते. दागिने असलेला बॉक्स त्यांनी बॅगेमध्ये ठेवून ही बॅग सीटच्या वरच्या भागात ठेवली होती. पहाटे सव्वा दोनच्या सुमारास त्यांची बस जेवणासाठी सुपे येथील हॉटेल निसर्ग येथे थांबली होती. त्यावेळी हानवते दाम्पत्य बसमधून खाली उतरले होते. त्यानंतर त्यांची बस सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास कळंबोली येथे पोहोचल्यानंतर हानवते दाम्पत्य रिक्षाने आपल्या मुलीच्या घरी गेले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी आपली बॅग तपासली असता, त्यातील बॉक्समधील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बसमधून प्रवास करताना चोरट्याने त्यांचे दागिने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करून शोध सुरू केला आहे.

Exit mobile version