साप मारण्यापेक्षा वाचविण्याकडे कल

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सह्याद्रीच्या पर्वतरांगा व विपुल वनसंपदा यामुळे रायगड जिल्ह्यात सापांसाठी चांगला अधिवास आहे. तसेच येथे विविध जातींचे साप आढळतात. काही वर्षांपूर्वी मानवी वस्तीत किंवा परिसरात साप आल्यास त्याला सर्रास मारले जात होते. शिवाय त्यांच्याबद्दल अनेक अंधश्रद्धा व गैरसमज होते. मात्र मागील 7-8 वर्षांत ही परिस्थिती बदलली आहे. जिल्ह्यात 200 ते 300 सर्पमित्र, विविध संघटना, संस्था आणि वनविभाग यांच्या प्रभावी जनजागृती व प्रबोधनामुळे लाखो सापांचे जीव वाचले आहेत. सुधागडात सर्पमित्रांच्या मदतीने विविध जातीचे साप वाचविले आहेत. जिल्ह्यात विविध प्रकारचे साप आढळतात. यामध्ये दुर्मिळ सापांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वी उरण येथे सोनसर्प जातीचा दुर्मिळ साप आढळला होता. त्याला सर्पमित्रांनी सुखरूप जंगलात सोडले. जिल्ह्यात 15 ते 20 सर्प व वन्यजीव संस्था काम करत आहेत. या बरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान 15 सर्पमित्र व तज्ञ आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सर्पमित्रांची संख्या वाढल्याने सापांचा जीव देखील वाचत आहे. साप मारण्यापेक्षा तो वाचवण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. विहिरीत, तलावात, छपरावर, कारखान्यात आदी ठिकाणी अडकलेल्या सापांना सर्पमित्रांनी जीवाची बाजी लावून वाचविले आहे. रायगड जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक गणेश महेंदळे म्हणाले की गेली अनेक वर्ष जिल्ह्यात सापांविषयीचे प्रबोधन आणि जनजागृती सुरू आहे. लोकांची सापांविषयीची भीती जरी काही प्रमाणात कमी झाली नसली तरी देखील साप हा अन्न साखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे तो वाचला पाहिजे याची जाणीव आता लोकांना झाली आहे. त्यामुळे साप मारण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. यासंदर्भात वनविभागाचा दृष्टिकोन खूप चांगला आहे. सापांविषयी प्रबोधन अविरत सुरू राहणार आहे. असे देखील मेहंदळे म्हणाले.

लोक सर्पमित्राला बोलवतात पण ते स्वतःहुन सापाला वाचविण्यासाठी पुढे यायला हवेत.वनविभाग,वन्यजीव संस्था, सर्पमित्र व चळवळीच्या माध्यमातून सर्पविज्ञान किंवा सापांविषयी माहिती पोहोचल्यामुळे रायगड जिल्ह्यात जवळपास 99 टक्के लोक सापाला मारत नाहीत. किंवा इजा पोहचवत नाहीत. सापांचा अधिवास सुरक्षित राहिला पाहिजे, असे देखील ठाकूर म्हणाले. पडकी व बंद घरे, वाडे, झाडी झुडुपे वाढणे, कचर्‍यामुळे उंदीर व घुशींचे प्रमाण वाढले, सापांचा अधिवास नष्ट होणे. यासह मादीच्या व भक्ष्याच्या शोधात साप मानवी वस्तीत येत असावेत. मात्र त्यांना मारण्याच्या घटना कमी झाल्या आहेत. असे सर्पमित्र अमित निंबाळकर व तुषार केळकर यांनी सांगितले.

Exit mobile version