विरोध डावलून व्हेरिटास पॉलिकेम कंपनीची पायाभरणी
। बोर्ली पंचतन । उदय कळस ।
दिघी पोर्ट येथे होणार्या व्हेरिटास पॉलिकेम या रासायनिक कंपनीला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध असतानाही शुक्रवारी येथे या कंपनीचे भूमिपूजन करण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत.यामुळे दिघीपोर्ट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.
या कंपनीच्या उभारणीला ग्रामस्थांनी पहिल्यापासूनच विरोध दर्शविलेला आहे. दर्शविला होता अनेक तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने याबाबत 2020 मध्ये जनसुनावणी घेतली यामध्ये उपस्थित पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला होता तरीदेखील आता तीन वर्षांनंतर ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे कल्पना न देता या व्हेरिटास पॉलिकेम कंपनीच्या स्थापनेचे पहिले पाऊल कंपनी प्रशासनाने टाकले.शुक्रवारी दिघी पोर्ट मध्ये या कंपनीच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आल्याचे ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थानी ही कंपनी येथे चालू करण्याबाबत तीव्र विरोध दर्शविला व काही दिवसांत या कंपनीच्या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचे ग्रामस्थानी पत्रकारांना सांगितले.
कंपनीच्या भूमिपूजनामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी प्रमुख पदाधिकारी एकत्र येत या कंपनीचा निषेध नोंदवित हा प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. दोन दिवसांत याबाबत तातडीची ग्रामसभा घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे दिघी ग्रामपंचायतीचे सरपंच विपुल गिरीवले यांनी पत्रकाराना सांगितले.
यावेळी दिघी सरपंच विपुल गोरीवले, गावप्रमुख हरिदास पाटील, कोळी समाज अध्यक्ष किरण कांदेकर, मुस्लिम समाज सचिव अमन हदादी, कोळी समाज माजी अध्यक्ष जनार्दन गोवारी, मच्छिमार सोसायटी चेअरमन लक्ष्मण मेंदाडकर, माजी सभापती देविदास कावळे, उपसरपंच गोपाळ मेंदाडकर, कोळी समाज सचिव मंगेश गुणाजी, खजिनदार पांडुरंग मेंदाडकर ग्रामस्थ पांडुरंग दिघीकर, अब्रार हदादी, इम्तियाज तुर्की, एकविरा , माजी उपसरपंच गोविंद गुणाजी, हरिश्चंद्र झेंगर आदी निषेध करण्यासाठी उपस्थित होते.