| जालना | प्रतिनिधी |
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षांना आज पासून सुरुवात झाली. पहिलाच मराठीचा पेपर बदनापूर शहरातील जिल्हा परिषद शाळेच्या केंद्रावर पेपर फुटल्याची चर्चा आहे. शिक्षणाधिकाऱ्यांसह तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी परीक्षा केंद्रावर ठाण मांडून आहेत. संबंधितांकडून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केले. तसेच, यवतमाळ जिल्ह्यातही दहावीचा पेपर फुटल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून सुरु झाली. परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी व्हिडिओ शुटिंग, पोलिस गस्ती पथक, बैठे पथक आदी यंत्रणा कार्यरत आहे. असे असतानाही परीक्षेत कॉपी प्रकरणांना आळा बसलेला नाही. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फुटल्याची चर्चा आहे. त्यासह मंठा तालुक्यातील तळणी परीक्षा केंद्रांवरही गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा समोर आल्याने तातडीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाने परीक्षा केंद्रांवर शिक्षणाधिकारी यांना पाठवले. परीक्षा केंद्रांवर तपासणी सुरू असून, याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी काय म्हणाले?
दहावीचा पेपर फुटल्याच्या बातमीत काहीच तथ्य नाही. समाज माध्यमावर जो पेपर व्हायरल झाला होता तो वेगळा पेपर आहे. व्हाट्सअप वरती जे सर्क्युलेट झालं होतं ते उत्तर पत्रिकेचा भाग नाही. अशा पद्धतीची कोणतीही घटना घडली नाही. एका पालकांनी तिथे दगड फेकला होता त्यावर कारवाई केली जाणार. सर्व केंद्रावर कडक बंदोबस्त आहे.