। रायगड । वार्ताहर ।
महाशिवरात्रीनिमित्त उरण तालुक्यातील शिवमंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. घारापुरी बेटावरील लेणी व शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरदिवशी हजारो पर्यटकांची रेलचेल असते. यावर्षी महाशिवरात्री उत्सव हा बुधवारी आल्याने अबालवृद्धांनी सकाळ पासून आप आपल्या गावातील शिव मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. त्यात घारापुरी बेटाकडे जाणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने व घारापुरी ग्रामपंचायतीने विशेष काळजी घेतली होती.

घारापुरी प्रमाणे कळंबुसरे, केगांव, उरण शहर, कोटनाका रेल्वे व आवरे येथील शिवमंदिरात भाविकांनी सकाळ पासून गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. तालुक्यातील हजारो भाविकांनी शिवाच्या पिंडीवर बेल, फुले वाहून दुग्धाभिषेकही केला. यावेळी मंदिर परिसर ‘हर हर महादेव’च्या गजराने दुमदुमून गेला होता.

महाशिवरात्री निमित्त अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील गोकुळेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

श्रीवर्धन तालुक्यातील देवखोल गावात डोंगराच्या कुशीत वसलेल्या श्री कुशमेश्वरच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

महाशिवरात्री निमित्त कामोठेच्या प्राचिन शिव शंकरच्या मंदिरात सकाळ पासून भाविकांनी दर्शन घेण्याकरता गर्दी केली होती. दरम्यान, विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.

कर्जत तालुक्यातील आसल या गावी तेथील सामाजिक कार्यकर्ते विजय दिलीप गायकवाड यांनी आदियोगी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तालुक्यातील ही पहिलीच आदीयोगी मूर्ती असल्याने येथे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. दरम्यान, विजय गायकवाड यांनी आदी योगी मूर्तीच्या बाबतीत आणि तेथील बगीचा बाबत संकल्पना स्पष्ट केली. तसेच, आदी योगी मूर्तीच्या बाजूलाच आसल आणि आसल पाडा या गावाचे पुरातन शिव मंदिर आणि पुरातन तलाव आहे. त्याचे सुशोभीकरण करण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याच संकल्प विजय गायकवाड यांनी जाहीर केला आहे.

महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी तळा शहरातील ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर भाविकांची एकच गर्दी उसळली होती. स्वर्गीय हरिभाऊ चांडीवकर यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर महाशिवरात्री उत्सवाला सुरुवात झाली. त्यांच्या पश्चात जयहरी सेवा मंडळातर्फे गेल्या सतरा वर्षांपासून तळगडावर महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यावेळी गडावरील महादेवाच्या पिंडीच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी पहायला मिळाली. बाजारपेठेतून महाशिवरात्री निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विलास ठक्कर यांनी भगवान शंकराची हुबेहुब प्रतिकृती साकारली होती. महाशिवरात्रीच्या निमित्ताने वर्षातून एकदा तळगडावर जाण्याचा योग येत असल्याने भर दुपारी कडकडीत उन्हातही भाविक तळगड किल्ला चढत होते. यामध्ये लहान, तरुणांसह जेष्ठांचा सहभागही लक्षणीय होता.

मुरुड शहरातील प्राचीन काळातील भोगेश्वर पाखाडी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज व देवस्थान ट्रस्ट मधील शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. मुरुड शहरासह पंचक्रोशीतील मंदिरात ‘बम बम भोले’चा जयघोष करत शेकडो भाविकांनीची गर्दी उसळली आहे. पहाटेच्या सुमारास शिवलिंगला अभिषेक करण्यात आले. त्यानंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले. सायंकाळी मंदिरात शारदोत्सव महिला मंडळ गावदेवी यांच्या भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.