उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
। मुंबई । प्रतिनिधी ।
गेली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावर असल्याने मनावर बंधने ठेवून बोलावे लागत होते. पण, आता तोंडचा मास्क निघाला असून, दसरा मेळाव्यातच शिवसेनेवर झालेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देईन, असा इशारा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौर्यात धोका देणार्या ठाकरेंना आगामी निवडणुकीत धडा शिकवा, असा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मातोश्री येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घ्यायचाच आहे. तेव्हा जे बोलायचंय ते बोलेनच; पण आता एक बरंय, की आत्तापर्यंत बोलताना तोंडावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क असायचा, त्यामुळे जरा जपूनच बोलावं लागायचं. आता त्यावेळी जे सुचेल, जे बोलायचंय ते बोलेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
माझीही ओळख होतीच ना ममता बॅनर्जींशी. मी घेऊन गेलो असतो सगळ्यांना कोलकत्त्याला. तिकडे कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं. राजस्थानला कुठेतरी नेलं असतं. पण, तो माझा स्वभाव नाही. राहायचं असेल तर निष्ठेनं राहायचं. मनात शंका-कुशंका घेऊन राहाणं याला राहाणं म्हणत नाही. मी सगळ्यांना सांगितलं, दरवाजा उघडा आहे. राहायचं त्यांनी निष्ठेनं राहा, असंही यावेळी ते म्हणाले.
मला कसलीच चिंता नाही. जे काही आहे, ते माझं नाही. माझी काही खासगी मालमत्ता नाही. मुख्यमंत्रीपद जर मला पाहिजे असतं, तर मी एका क्षणात ते सोडू शकलो नसतो. आपल्याकडे 30-40 आमदार तेव्हा होतेच. मला मुख्यमंत्रीपदावर चिकटून राहायचं असतं, तर मी त्यांनाही डांबून ठेवू शकलो असतो.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
शिंदे गट बी.के.सी.साठी आग्रही
शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी आधी परवानगी पत्र दाखल करण्यात आले असून, शिंदे गटाने त्यानंतर शिवाजी पार्कवर मेळावा करण्यासाठी परवानगी अर्ज दाखल केला आहे. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, शिवसेनेला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पाश्वर्र्भूमीवर शिंदे गटाने बी.के.सी.मध्ये दसरा मेळावा घेण्याची तयारी ठेवल्याचेही सांगितले जात आहे.