555.49 लाखांचा निधीचे वितरण; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती
। मुंबई । दिलीप जाधव ।
कोकणातील पर्यटन वाढण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, प्रादेशिक पर्यटन विकास योजना 2021-22 अंतर्गत रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, हरिहरेश्वर, आक्षी व श्रीवर्धन या समुद्रकिनारी विकासकामांसाठी 1172.51 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन 555.49 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे, असे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, आरे-वारे, आबोळगड, कशेळी -अणुपुरे व गणपतीपुळे या समुद्रकिनारी विकासकामांसाठी 703.71 लाख रुपयांच्या रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन 290 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. पालघर जिल्ह्यातील माहीम, शिरगाव, केळवा, मुरबे व झाई या समुद्रकिनारी विकासकामांसाठी 148.14 लाख रकमेस प्रशासकीय मान्यता देऊन 91 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात सांगितले आहे.
मालवण नगरपरिषद हद्दीमध्ये पर्यटकांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्गकडून 2021-22 मध्ये 200.00 लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन या योजनेंतर्गत सिंधुदुर्ग कोस्टल सर्किट हा प्रकल्प मंजूर असून, या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरेश्वर, तारकर्ली, मिठबाव व विजयदुर्ग या समुद्रकिनार्यांवर उपाहारगृह, स्वच्छतागृह, निरीक्षण, मनोरे, पदपथ, प्रदीपन, रेस्क्यू बोट्स इत्यादी सुविधा पुरविण्यात येत आहेत, तसेच राज्यातील समुद्रकिनारी बीच शेक्स धोरण राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून, या धोरणांतर्गत प्रथम टप्प्यात गुहागर, आरेवारे, कुणकेश्वर, तारकर्ली, वरसोली, दिवेआगर, केळवा, बोर्डी या समुद्रकिनार्यांवर बीच शेक्स उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे, असेही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितले आहे.
रायगडातील समुद्रकिनारे होणार सुशोभित
