उरणमध्ये बांगलादेशींचा वावर

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे रोजगाराच्या शोधार्थ बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा फायदा हा बांगलादेशातील नागरिकांनी उठून आपले बस्तान बसवले आहे. याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळताच नुकतेच उलवे नोड परिसरातून तीन महिला व दोन पुरुष अशा एकूण पाच बांगलादेशी नागरिकांना जेरबंद केले आहे.

दरम्यान, बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांवर स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा यांचा अंकुश न राहिल्याने त्याचा फायदा हा बांगलादेशातील नागरिकांनी उठून आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली आहे. जासईसह इतर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या काही बांगलादेशातील नागरिकांवर याअगोदर उरण पोलीस यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारला होता. नवी मुंबई पोलीस यंत्रणेला उलवे नोड परिसरात काही बांगलादेशातील नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी तीन महिला व दोन पुरुषांना अटक केली आहे.

एकंदरीत कायदा सुव्यवस्थेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उरण पोलीस, न्हावा शेवा पोलीस आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून भाडेकरुंची माहिती संबंधित घर मालकांकडून घेण्यात यावी, तसेच काही कंटेनर यार्डच्या मालकांनी, व्यवस्थापनाने आपला पैसा वाचविण्याच्या उद्देशाने यार्डमधील कामाची हाताळणी करुन घेण्यासाठी कंटेनर यार्डमध्ये वास्तव्यास ठेवलेल्या कामगारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जनमानसातून करण्यात येत आहे.

Exit mobile version