नेरळमधील गुरांच्या दवाखान्याला टाळे

अनेक महिने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव; पशुपालक संतप्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ येथे असलेला पशुवैद्यकीय दवाखाना गेली अनेक महिने बंद आहे. या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने या दवाखान्याला टाळे लावण्यात आले आहे. दरम्यान या रुग्णालयातील डॉक्टर उपलब्ध नसल्याने नेरळ परिसरातील 20 गावे आणि वाड्यामधील पशुपालकांना आपल्या पशूंना खासगी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे उपचारासाठी न्यावे लागत आहे. त्यामुळे पशुपालक संतप्त झाले आहेत.

नेरळ गावातील खांडा भागात पशुवैद्यकीय दवाखाना असून किमान 20 वर्षे तेथे पशुपालक यांना सेवा देण्याचे काम केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षात नेरळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना यास कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही. कर्जत तालुक्यात पशुवैदयकीय अधिकारी यांची अनेक पदे रिक्त असल्याने नेरळमध्ये देखील गेली चार वर्षे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे आजुबाजूच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन अधिकाऱ्यांकडे एकाहून अधिक पशुवैद्यकीय दवाखाना यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

नेरळ येथे वाकस येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी आहे. पुढे चिंचवली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे माथेरान पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार आहे. मात्र असे असताना नेरळ परिसराचे पशुपालक यांच्यासाठी आरोग्य केंद्र असलेल्या नेरळ पशुवैद्यकीय दवाखान्याला कोणीही वाली राहिलेला नाही. त्यामुळे तेथे चक्क टाळे लावण्यात आले असून पशुपालक यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

नेरळ परिसरातील नेरळ वगळता अन्य प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर पशुधन स्थानिक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. मात्र नेरळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला टाळे लावण्यात आल्याने पशुपालक संतप्त झाले आहेत. या पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात असलेले पशुपालक यांच्या असलेले पशू यांच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर खासगी पशुधन अधिकारी यांच्याकडे जावे लागत आहे. नेरळमध्ये असलेल्या दवाखान्याला टाळे लावण्यात आले असून येथे तेथील पर्यवेक्षक यांचा नंबर लावण्यात आला आहे. मात्र हे पर्यवेक्षक कर्मचारी शेतकऱ्यांचे फोन देखील घेत नाही आणि कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुवर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे? हे स्थानिक शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे नेरळ भागातील पशुपालकांवर संकट आले आहे.

चौकशीची मागणी
लम्पीसारखा आजार शेतकऱ्यांच्या पशूंना भेडसावत आहे. त्यामुळे सरकारने या ठिकाणाच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. भडवळ गावातील तरुण कार्यकर्ते महेश जामघरे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी यांची महिनोन्महिने अनुपस्थिती आणि पशुधन दवाखाना याला लावण्यात आलेले टाळे याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
Exit mobile version