। मुंबई । वृत्तसंस्था ।
शिवसेना आमदार अपात्रतेबाबत दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या कारणावरून नुकतेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारले होते. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांच्याकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या असून नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने अखेर अपात्रतेबाबतच्या सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियातून दिली आहे.
शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक 13 ऑक्टोबरला सर्व याचिका एकत्र करायच्या की नाही यावर सुनावणी. 13 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दोन्हीही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार. 20 ऑक्टोबर रोजी सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला देणार, ऑक्टोबरला काही अधिकची कागदपत्रे एखाद्या गटाला सादर करायची असतील तर त्यासाठी संधी दिली जाणार. 27 ऑक्टोबरला दोन्हीही गट आपापलं म्हणणं मांडणार. 6 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही गट आपली बाजू मुद्देसूद मांडतील. त्यानंतर दावे आणि प्रतिदावे करतील. 10 नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार. 20 नोव्हेंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी सादर केली जाणार. 23 नोव्हेंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार.
अंतिम युक्तिवाद सगळ्यांचे म्हणणे-पुरावे ऐकून घेण्याची वरील सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाईल
वरील वेळापत्रक कुणाचीही विशेष अडचण नसल्यास व कुणी सुनावणी तहकुबीचा अर्ज न दिल्यास शक्यतोवर ठरलेल्या तारखांनुसार पार पाडली जाईल आणि तारखांमध्ये काही बदल झाल्यास तसे वकिलांना कळवले जाईल, असे विधानसभा सचिवालयाने विधानसभा अध्यक्षांच्या सहीने जाहीर कळवले आहे.