चौलमळा जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था
| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली असून, धोकादायक झालेल्या इमारतीची कौले फुटल्याने वर्गखोल्यांना गळती लागली आहे. विद्यार्थ्यांना वर्गात साचलेल्या पाण्यातच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाचा शाळेच्या दुरुस्तीकडे दोन वर्षांपासून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
चौलमळा येथील जिल्हा परिषदेची ही पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, दोन वर्गखोल्या आणि कार्यालयाचे कामकाज चालते. सद्यःस्थितीत वर्गखोल्यांना गळती लागल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातच बसून शिक्षण घेण्याची वेळ आलेली आहे. शाळेत एकच शिक्षिका कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करुनसुद्धा वर्गखोल्यांची दुरुस्ती होत नाही. छपराचे वासे कुजले असून, कौलांचे तुकडे छपरावर लटकत आहेत. खिडक्या तुटल्या असून, स्वयंपाकघराला मोठी गळती लागली आहे. मात्र, याकडे अद्याप कोणीच अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नाही. फक्त प्रस्तावावर प्रस्ताव असा कागदांचा खेळ सुरू असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सुरक्षित व दर्जेदार शिक्षणाचा हक्क असलेल्या या चिमुरड्यांना गळक्या छताखाली बसावे लागत आहे. त्यातच वर्गात साचलेले पाणी वर्गाबाहेर काढायचे कसे, असे विदारक चित्र पाहायला मिळाले. पालक आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्य शासनाकडून शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी दिला जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, चौलमळा येथील घटनेने शिक्षण विभागाच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. आता कुठे पावसाळा सुरू झाला असून, अद्याप चार महिन्यांचा पाऊस बाकी आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आणि प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी, ही अपेक्षा करणेही चुकीचे आहे, असा संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आता प्लास्टिक ताडपत्री टाकून वर्गखोल्यांची गळती थांबवावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी शाळा दुरुस्ती प्रस्ताव पंचायत समिती शिक्षण विभागाकडे देऊनही दुरुस्ती होत नसल्याने व शाळेकडे दुर्लक्ष होत असल्याने आमच्या पाल्यांच्या जिवाचे नुकसान होऊ शकते, असा संताप चौल ग्रा.पं.चे माजी सदस्य शशिकांत म्हात्रे, ग्रामस्थ शैलेश नाईक, प्रशांत नाईक, राजेंद्र पाटील यांनी केला आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांना शाळेच्या दुरवस्थेबाबतची छायाचित्र 3 जुलै रोजीच पाठविण्यात आली आहेत. परंतु, मॅडम कामात एवढ्या व्यस्त आहेत, की त्यांना आजतागायत शाळेच्या भीषणतेची दखल घ्यावीशी वाटली नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन उचलण्याची तसदी त्यांनी घेतली नाही. शिक्षण विभागाकडे सप्टेंबर 2025 रोजीही दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. परंतु, कामाचा एवढा व्याप आहे, की या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले आहे.
मी फक्त प्रस्ताव पाठवू शकतो!
शाळेच्या दुरवस्थेबाबत गटशिक्षणाधिकारी कृष्णा पिंगळा यांना कळविण्यात आले. गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तासाभरात अलिबागवरुन चौल गाठले. परंतु, पाहणीदरम्यान त्यांनी माझ्याकडे निधी नाही, मी फक्त प्रस्ताव पाठवू शकतो, असे सांगितले. तर, जि.प. शिक्षण विभागाला अजून किती प्रस्ताव हवेत, की एखाद्याची जीव गेल्यावरच आपण याकडे लक्ष देणार, याबाबत शिक्षणाधिकारी दहितुले यांनी उत्तर द्यावे, अशी पालकांची मागणी आहे.
प्रशासकांचे आश्वासन
चौल ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. मागील दोन वर्षांपासून त्यांच्याकडे शाळेच्या दुरुस्तीबाबतचे विनंती अर्ज करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीचा संपूर्ण पावसाळा याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे छपरावरील कौले फुटून वासेही कुजले आहेत. कधी वासा किंवा कौलाचा तुकडा पडेल, हे सांगता येत नाही. याबाबत प्रशासक वाडेकर मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्याकडे आताच चार्ज आला आहे, असे प्रामाणिक उत्तर देत, त्यांनी जबाबदारीने तात्काळ शाळेवर प्लास्टिकची तातडपत्री टाकण्याचे आश्वासने दिले. परंतु, अद्याप तातडपत्री देण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळेची गळती कायम आहे.
