लाटांच्या तडाख्याने घाटाला तडे
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन शहरात खरेदीसाठी लगबग सुरू आहे. श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणावर घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून, परंपरेनुसार श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर गणेशमूर्तींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन केले जाते. मात्र, विसर्जनासाठी प्रशासनातर्फे बंधाऱ्यावर बांधण्यात आलेल्या विसर्जन घाटाची दुर्दशा झाली असून, यामुळे भाविकांकडून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
समुद्राच्या उधाणाच्या लाटा आणि तीव्र तडाख्यांमुळे किनाऱ्यावरील बंधाऱ्याला लागून असलेल्या विसर्जन घाटाची दुरवस्था झाली आहे. घाटाच्या सिमेंट-काँक्रिटला मोठमोठे तडे गेले असून, काही ठिकाणी सिमेंटचा थर निघून जाऊन आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत. तसेच, खालील बाजूची माती व दगड वाहून गेल्याने घाटाच्या रचनेला मोठी पोकळी निर्माण झाली आहे आणि तो अत्यंत कमकुवत झाला आहे.
गणेश विसर्जनासाठी समुद्र किनाऱ्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असते. तडा गेलेल्या घाटामुळे भाविकांचा पाय अडकून जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्या पडलेल्या सळ्यांमुळे भाविकांच्या पायाला गंभीर दुखापत होण्याचाही धोका आहे. श्रीवर्धनच्या परंपरेनुसार विसर्जन सोहळा सुरळीत पार पडणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे प्रशासनाने व नगरपरिषदेने काही दुर्घटना होण्याअगोदर या कमकुवत झालेल्या घाटाची डागडुजी व दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी श्रीवर्धन मधील भाविक आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून केली जात आहे.
शहरातील समुद्रकिनाऱ्यावरील सर्व गणपती विसर्जन घाटाच्या पुनर्बाधणीची प्रक्रिया सुरु झाली असून, त्या अनुषंगाने टेंडर प्रोसिजर देखील करण्यात आलेली आहे. गणपती उत्सवाच्या आधी सर्व विसर्जन घाट तयार झालेले असतील.
अतुल चौगुले,
नगराध्यक्ष श्रीवर्धन नगरपरिषद







