ग्रीन कॉरिडोरमुळे कोंडी फुटणार
| चिरनेर | प्रतिनिधी |
सुमारे 3500 कोटी रुपये खर्चून मुंबई-गोवा आणि मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा 29 किलोमीटरचा जेएनपीए-पागोटे-चिरनेर ते चौकदरम्यान सहापदरी ग्रीन कॉरिडोर बांधण्यात येणार आहे. येत्या तीन वर्षांत त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच मुंबई-बंगळुरु प्रवास सहा तासांवर येईल, असा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी केला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, 48 आणि 348 या तीन महामार्गांसह ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटलसेतु, मुंबई-गोवा आणि गोवा-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालाही जोडणार आहे. त्यामुळे मुंबई-बंगळूरु प्रवास सहा तासात करणे सहज शक्य होईल. असा अंदाज प्राधिकरणाने वर्तविला आहे. उरण-पागोटे ते चौकदरम्यानच्या या मार्गाची लांबी 29. 219 कि.मी. आहे. या रस्त्यावर चिरनेर आणि आपट्यादरम्यान दोन बोगदेही उभारण्यात येणार आहेत. यात चिरनेर बोगदा 1.9 कि.मी.चा, तर आपटा बोगदा 1.7 किमीचा आहे. या टीन टनेलची लांबी 3.47 कि.मी. आहे. या मार्गावर सहा मोठ्या आणि पाच लहान पुलांसह सर्व्हिस रोड, स्लीप रोडचा समावेश आहे.
असा असेल मार्ग!
मुंबईच्या अटल सेतुवरून खाली उतरल्यानंतर मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असा हा नवा महामार्ग असणार आहे. पुणे, सातारा, सांगली, बेळगाव असा हा मार्ग असेल. त्याचं 307 किलोमीटर अंतर महाराष्ट्रातून आणि 493 किलोमीटर अंतर कर्नाटकातून जाईल. या महामार्गामुळे मुंबईहून पुण्याला दीड तासात पोहोचता येईल, तिथून पुढे बंगळुरूला साडेचार ते पाच तासांत जाणं शक्य होईल.