| नेरळ | वार्ताहर |
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यात सराटी गावात मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्या ठिकाणी झालेल्या पोलिसांच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 11 सप्टेंबर रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, नेरळ बाजारपेठ सोमवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत बंद होती तसेच मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून देखील निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांचे पुतळ्याला अभिवादन करून नेरळ गावात मोर्चा काढला. त्यावेळी मराठा समाजाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सकल मराठा समाजाने आवाहन केल्याप्रमाणे तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील गावांमध्ये असलेल्या लहान बाजारपेठा देखील बंद मध्ये सहभागी झाल्या होत्या. तालुक्यातील कशेले, कळंब, कडाव आणि डिकसळ या ठिकाणी असलेली दुकाने बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला होता.