15 दिवसांपासून पाण्याचा थेंब नाही
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीमधील लाखाची वाडीमध्ये जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. मात्र, या नळपाणी योजनेच्या विहिरीतील पाणी तेथील फार्महाऊस मालकाने पळवले असल्याने त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना गेली 15 दिवस पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे नळपाणी योजना असूनदेखील पाण्याची टंचाई जाणवत असल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
लाखाची वाडी येथील ग्रामस्थांना गेल्या 15 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जाव लागत आहे. जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबविण्यात आलेली असूनदेखील नळाचे पाणी मिळत नसल्याने ऐन उन्हाळ्यात आदिवासी ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या नळपाणी योजनेचे उद्भव विहिरीत पाणी असूनदेखील घरकुल योजनेंतर्गत लावलेल्या मोटारीमुळे सगळं पाणी खेचून घेतले जात आहे. त्यामुळे गावकर्यांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नाही. त्याचवेळी तेथील फार्महाऊस मालक यांनी विहिरीमध्ये पाईप टाकून पाणी उचलण्याचे उपद्व्याप सुरू केले असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत.
आदिवासी ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आपल्या भावना व्यक्त करताना आम्हाला दिवसाला एक घोट पाणी मिळणं कठीण झाले आहे. विहिरीमध्ये पाणी असूनही ते फार्मवर नेले जात आहे. ग्रामस्थांना नळाची जोडणी दिली आहे, पण त्यामधून पाणी येत नाही. नळपाणी योजनेची टाकी सहा महिन्यांपूर्वी बांधली, पण पाणी पळविले जात असल्याने पाण्याची टाकी रिकामीच आहे. पाण्याचे वितरण करण्यासाठी वितरण व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र पाणीपुरवठा ठप्प आहे. त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी लांब चालत जावे लागत आहे.
आमच्या विहिरीतील पाणी ग्रामपंचायत प्रशासनाने आम्हाला देण्याची व्यवस्था करावी आणि आमचे पाण्याचे हाल थांबवा. विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरता यावे आणि नळातून नियमित पुरवठा सुरू करावा.
ग्रामस्थ,
लाखाची वाडी