। अलिबाग । वैभव पाटील।
अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड परिसरात बुधवारी (दि.7) दुपारी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे व सोसाट्याच्या वार्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मोठमोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. या अचानक बदललेल्या हवामानामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.ऐन लग्नसराईमध्ये आलेल्या पावसामुळे लग्न मंडपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर आंबा, काजू, बागायतदार शेतकर्यांचे व वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, गूरांसाठी साठवुन ठेवण्यात आलेला चारा देखील भिजला असल्याने गुरे मालकांचे देखील नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी झालेल्या आंब्यांवर अवकाळीमुळे आंबे खराब होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकर्यांना पडली आहे.