। सांगोला । प्रतिनिधी ।
मुलगा त्याच्या आईला हाताने मारहाण करून शिवीगाळी करत असताना, भांडण सोडवण्यास गेलेल्या बापास, मुलाने ढकलुन दिल्याने चिडलेल्या बापाने मात्र जवळच पडलेली कु-हाड उचलुन मुलाच्या डोक्यात दोन वेळा घाव घालून खून केला असल्याची घटना हातीद ता. सांगोला येथे गुरुवारी (दि.10) रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी बिरा बंडगर रा. शिंपीवस्ती शाळेच्या पाठीमागे हातीद ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी तक्रार दिली असून, रोहिदास रामा पवार (18) रा. कुसुबळे आदिवासी वाडी, निजामपुर ता. माणगांव जि. रायगड असे खून झालेल्याचे नाव आहे. तर वडील रामा किसन पवार यांच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांची हातीद येथे सामाईक जमीन असून ती पडीक असल्याकारणाने त्यावर चिलारीची लहान-मोठी झाडे वाढली आहेत. ती स्वच्छ करण्यासाठी एक महिन्यापूर्वी रामा पवार व त्याची पत्नी गौरी व मुलगा रोहिदास असे तीघेजण राहण्यास होते. तक्रारदार यांच्या पडीक शेतात राहून तेथील काटेरी चिलार तोडून त्याचा कोळसा करत होते.
गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तक्रारदार घरा बाहेर जनावरांना चारा पाणी करीत असताना, शेतात कोप मारून राहत असले रोहिदास याचे व आई गौरी यांच्याशी कोणत्यातरी कारणाने भांडण सुरू असल्याचा आवाज आला. त्यावेळी तक्रारदार व घरातील लोक यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता, मुलगा रोहीदास हा, त्याच्या आईस हाताने मारहाण करून शिवीगाळी करत होता. त्याचे वडील रामा पवार हे सोडविण्यासाठी गेले असता, मुलगा रोहिदास याने वडीलास ढकलुन दिले, त्यानंतर मात्र रामा पवार यांनी जवळच पडलेली कु-हाड उचलुन रागाने मुलगा रोहिदास यास, तुला आज सोडत नाही, असे म्हणून रोहिदास याच्या डोक्यात दोन वेळा कुर्हाडीचे घाव घातल्याने तो पडला. यावेळी तक्रारदार व इतर लोकांनी रामा पवार यास पकडून ठेवले, त्यानंतर पोलिसांना फोन करून कळविले. पोलीस सदर ठिकाणी आल्यानंतर जखमी रोहिदास पवार यास ग्रामीण रूग्णालय, सांगोला येथे आणण्यात आले. तेव्हा वैदयकीय अधिकारी यांनी त्यास तपासून तो उपचारापुर्वी मयत झाला असल्याचे सांगितले.