। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील वराठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भारत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला परवानगी न घेता गैरहजर राहणे, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च न करणे, प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी न करणे असे आरोप त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करताना ठेवण्यात आले आहेत.
राज्याच्या मुख्यमंतत्र्यांनी 100 दिवसांचा महत्वाकांक्षी उपक्रम जाहीर केला आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा या बाबींवर भर दिला जात आहे. त्या संदर्भात महाड आणि पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकार्यांची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी बोलावली होती. महाड तालुक्यातील वराठी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मोतिसिंग लहानुजी भस्मे हे या बैठकीला पूर्व परवानगी न घेता गैरहजर राहिले होते. त्यांचा कामचुकारपणा देखील या बैठकीत आढळून आला. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश डॉ. बास्टेवाड यांनी दिले.
या आढावा बैठकीला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, महाडच्या गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पोलादपुरच्या गटविकास अधिकारी दिप्ती गाट, सहाय्यक गटविकास अधिकारी नामदेव आण्णा कटरे तसेच सर्व विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.