चौलमळा येथे आई कृष्णादेवीचा उत्सव जल्लोषात

द दमयंती दामले’ने दिली कौटुंबिक मनोरंजनाची गोड मेजवानी

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचा उत्सव शनिवार, दि. 2 मे रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले, तर रात्री रंगलेल्या ‌‘द दमयंती दामले : सासूबाईंचं चांगभलं’ या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून हसवत कौटुंबिक मनोरंजनाची मेजवानी दिली.

उत्सवाची सुरुवात सकाळी मुधकर नाईक यांच्या घरापासून देवीच्या मुखवट्याच्या सवाद्य मिरवणुकीने झाली. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या मुलींच्या लेझिम पथकाने मिरवणुकीत रंगत आणली. त्यानंतर मंदिरात श्रीसत्यनारायणाची महापूजा पार पडली. यंदा महापूजेचा मान राजेंद्र पाटील व प्रमिला पाटील या दाम्पत्याला मिळाला. भाविकांसाठी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


सायंकाळी भजन कार्यक्रमाने वातावरण अधिक भक्तिमय झाले. चंद्रकांत नवगावकर यांच्या भजनाला विकास पाटील, प्रथमेश पाथरे आणि राजू केळकर यांनी साथ दिली. रात्री सादर झालेल्या ‌‘द दमयंती दामले’ या नाटकाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. मराठी रंगभूमीवरील कौटुंबिक विषयांना उजाळा देणारे हे नाटक सासू-सुना आणि कुटुंबातील नातेसंबंधांतील गोडवा व तणाव यांचा सुरेख मिलाफ सादर करते. विशेष म्हणजे, विशाखा सुभेदार यांच्या प्रभावी अभिनयाने दमयंती दामले ही व्यक्तिरेखा अक्षरशः जिवंत झाली असून, त्यांच्या संवादफेकी आणि हावभावांना प्रेक्षकांकडून जोरदार दाद मिळाली.

नाटकातील खुसखुशीत संवाद, विनोदी प्रसंग आणि नात्यांमधील ओढाताण यांचे वास्तवदर्शी चित्रण प्रेक्षकांना आपलेसे वाटले. एकत्र कुटुंब पद्धतीतील प्रेम, मतभेद आणि समंजसपणाचा संदेश देणाऱ्या या नाटकाला शेकडो रसिकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनिष्का नाईक यांनी केले. तसेच कार्यक्रमा दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचादेखील गावचे प्रमुख रवींद्र घरत आणि उपप्रमुख जितेंद्र पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यकारी मंडळातील सदस्य राकेश लोहार, अल्पेश घरत, शरद नाईक, रवींद्र नाईक, सचिन गोंधळी, प्रशांत आमरे, महेश पाटील, प्रितेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ, युवक मंडळ आणि महिला मंडळाने परिश्रम घेतले. तसेच रेवदंडा पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले. गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, भजन मंडळ अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, उपाध्यक्ष अंजेश घरत व महिला मंडळ अध्यक्षा सीमा मुकादम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version