पुरातत्व विभागाकडून डागडुजीला प्रारंभ
| आगरदांडा | प्रतिनिधी |
राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यातील तोफा गंजल्याने तसेच तटबंदीचे दगड हा झिजू लागल्याने त्याच्या डागडुजीचे काम पुरातत्व विभागाने हाती घेतले आहे. किल्ल्याच्या संवर्धनासाठी तटबंदीवरील चिऱ्यांवर रासायनिक प्रक्रिया करण्यात येत आहे. यामुळे इतिहासप्रेमी व पर्यटकांनी पसंती दर्शविली आहे.
दरम्यान, किल्ल्याच्या आतील तटबंदीचे दगड व तोफा ना रासायनिक केमिकल लावण्यास सुरुवात केली आहे. हे काम पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून, स्थानिक एकदरा गावातील कोळी मुलांना हे काम देण्यात आले आहे. डागडुजीनंतर ऐतिहासिक जंजिरा किल्ला नव्याने पाहायला मिळणार आहे.
याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, तटबंदी करताना वापरलेले दगड झिजले असून, तसेच किल्ल्यावरील तोफाही गंजल्याने केमिकल ब्रँचतर्फे वास्तुसंवर्धनासाठी केमिकल उपचार सुरु केले आहे. यामुळे किल्लाचे आयुष्य वाढेल. हे काम एकदरा गावातील शिवम मकु व त्यांच्या 15 सहकाऱ्यांना दिला आहे. यामधून त्यांना चांगला रोजगार मिळाला आहे. दरम्यान, पद्मदुर्ग किल्ल्याचं संवर्धन कधी होणार, असा प्रश्न श्री. येलीकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पद्मदुर्ग किल्ला संवर्धनाचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल. यामध्ये दोन दरवाजे, वॉटर टायकिंग व डाग डुजी केली जाईल.